Wednesday, May 23, 2018

तो आणि ... ती (भाग ६)


" मग उद्या किती वाजताची फ्लाईट आहे "निहालने विचारले. 
" दुपारी १.३० ची. म्हणजे इथून १०-११ पर्यंत निघावे लागेल, हो ना? निर्वी प्रश्नार्थक उत्तरली.
" हो. ती सर्व व्यवस्था झाली आहे. रेहमान १०.३० वाजता पोहोचेल इथे. "
इतके संभाषण झाले आणि एक स्तब्ध शांतता पसरली त्या दोघांच्यात.दोघेही त्यांच्या त्याच नेहमीच्या जागेवर बसले होते त्या संथ झालेल्या पाण्याकडे पाहत. एक हवेची गार झुळूक त्याला स्पर्शून गेली तसा निहाल विचारांच्या दुनियेतून माघारी वर्तमानात आला.
" मग उद्या तुम्ही जाणार तर. हे दृश्य, ही जागा मिस करेल मग तुम्हाला. 
" फक्त ही जागाच मिस करणार ? तुम्हाला आमची आठवण येणार नाही का ?"
" अरे, असे का बोलता. अर्थात. तुम्हाला कसा विसरेन मी. पण हे दोन महिने कसे गेलेत समजलेच नाहीत ना ?"
" हो ना. ते मात्र खरंच. मी तर आले तेव्हा फार घाबरले होते. कसे घालवणार इतके दिवस एकटी मी या जागेवर, असे वाटले होते. माझा पहिला दिवस आठवतो? रडले होते मी अक्षरशः (तिला  स्वतःचेच हसू येते ) पण इथून जाताना तुमची इतकी सुंदर मैत्री मी सोबत घेऊन जाईल असे स्वप्नातही वाटले नव्हते कधी. You know you are a precious gift in my life.... "
निर्वी बोलतच होती पण मध्येच निहालला काही आठवले आणि त्याने तिथेच  तिला थांबवले.
" अरे गिफ्टवरुन आठवले. मी हे तुमच्यासाठी त्यादिवशी घेतले होते पण नंतर देणे जमलेच नाही. आज आठवणीने घेऊन आलो."
असे म्हणत निहालने एक बॉक्स तिच्यासमोर धरला.
" अरे वाह ! गिफ्ट ? माझ्यासाठी ? काय आहे ? उघडून पाहते मी."
आणि निर्वीने पटापट त्यावरचे सुशोभित कागद अलग केले.
"Wowwww  ! हे अत्तर तर मला त्यादिवशी फार आवडले होते पण .... काय हो ? हे खूप महाग आहे ना ?इतके महागडे गिफ्ट कशाला घेतले माझ्यासाठी ?"
" अहो मॅडम , घ्या हो . त्यादिवशी मी एकदोनदा पाहिले कि तुम्ही सारख्या या अत्तराभोवती घुटमळत होतात. खूप आवडले होते ना तुम्हांला हे. आणि मलाही तुम्हाला काहीतरी द्यायचे होतेच. पण काय द्यायचे , तुम्हाला काय आवडेल हा पेच होता.. उलट तुम्ही सर्व सोपं करून दिलं. आणि मी generally कोण्या मुलीला गिफ्ट देत नाही , बरे का . तुम्हाला मिळते आहे तर आनंदाने स्वीकार करा की... म्हणजे आम्हांलाही आम्ही दिलेले काही तुम्हाला आवडले याचा आनंद होईल. "
निहालच्या भावना फार प्रामाणिक होत्या. निर्वी मनातल्या मनात खूप आनंदी होती. तिने त्या अत्तराचे दोन थेंब स्वतःच्या मनगटावर शिंपले आणि एका श्वासात तो सुगंध मन भरून स्वतःमध्ये सामावून घेऊ लागली. त्या अत्तराची मोहिनी तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती . ते पाहून त्यालाही समाधान वाटले.
" थँक यू. खरंच, खूप काही केलं हो तुम्ही माझ्यासाठी. गिफ्ट तर फार पूर्वीच दिले होते तुम्ही. तुमच्यामुळेच मला माझ्या मनातले प्रेम व्यक्त करण्याची हिम्मत आली आहे. "
" हो ना . पण ते प्रेम अजून प्रत्यक्षरित्या व्यक्त कुठे झालंय अजून?"
" होईल हो . इतकी काळजी करू नका. तो पुढच्या महिन्यात येणार आहे मुंबईत. तेव्हा त्याच्या समोर सर्व मन रिते करेन मी. तो येणारा क्षण कितीदा माझ्या स्वप्नात येतो आणि त्याच्या प्रत्यक्ष अनुभूतीसाठी मीही कितीतरी आतुर आहे आता . "
" हो पण. अशा गोष्टींमध्ये अधिक वेळ घालवू नये असे माझे मत आहे. पण असो , तुम्ही जो निर्णय घेतला असेल तो योग्यच असेल."
" आणि आता तुम्ही पण मनावर घ्या आणि एखादा निर्णय घेऊन टाका" निर्वी पटकन बोलून गेली तसा निहाल चरकला. 
" मी ? मी कसला निर्णय घ्यायचा आता? माझे कुठे मध्येच आता ?"
" तसे नाही हो. तुमच्या आई खूप प्रेम करतात तुमच्यावर. खूप काळजी आहे तुमची. आता किती दिवस पूर्वीच्या गोष्टींमध्ये जळत राहणार ना ? नव्याने आयुष्य सुरु करा. स्वच्छ मनाने आसपास बघा एकदा , तुम्हाला हवी तशी अजूनही या जगात मिळू शकेल.तिला शोधायला हवे."
" अच्छा . असं म्हणताय. पाहिलं आसपास. तुम्ही दिसल्या मला. काय करू ?करू का प्रपोज ? हो म्हणाल ?
निहाल अगदी सहज म्हणाला आणि निर्वी मात्र स्तब्ध झाली. शब्दांची वाटच थांबली जणू. तिचा चेहरा पाहण्यालायक झाला होता आणि तो गंभीर चेहरा पाहून तो पोट धरून जोरजोरात हसू लागला.
" अहो मॅडम , काय तुम्ही? अजून ओळखलं नाही म्हणजे आम्हांला.चेहरा पहा तुमचा कसा झालाय ते. अहो ,गंमत केली मी. आणि मला काय तुमची कहाणी माहित नाही ?आधीच त्या मिस्टर कॅलिफोर्नियामुळे तुमच्या मनाची नाव सतत विचारांच्या वादळात हेलकावे खात असते त्यात मी कुठे आणखी मोठा सुनामीचा झटका देऊ तुम्हाला. "
तो नियंत्रणाबाहेर हसतच होता. ती मात्र तरीही शांतच.मध्येच तिला ते हासू कृत्रिम वाटत होते. मग आपलेच हसू आवरत तो अचानक गंभीर झाला ... एक भला मोठा विराम आला संभाषणात. आणि मग निहाल सांगू लागला ,
" हे पहा मॅडम , आपण एकदाच जगतो... या जगात मरतोही एकदाच ... आणि प्रेमसुद्धा फक्त एकदाच होते..."
" अरे वाह ,  कुछ कुछ होता हैं ! .... हे तर शाहरुख म्हणतो ना असे... ?"
" हो मग ? आम्ही नाही बोलू शकत ? माझेही तेच मत आहे... आता प्रेम एकदाच झाले होते ... ते पुन्हा होणे शक्य नाही... सॉरी , पण विषय संपला."
तो किती ठाम होता त्याच्या मतावर, त्याच्या निर्णयावर. निर्वी त्याच्याकडे पाहतच राहिली. तो खूप अस्वस्थ झाला होता. मग तिनेही माघार घेतली.शांतच झाली ती. काय बोलावे ते सुचेचना. त्याने तिच्याकडे एकवार पाहिले. तिच्यावर काही क्षणांपूर्वी आवाज चढवला होता आणि ते तिला फारसे आवडले नाही हे स्पष्ट दिसत होते चेहऱ्यावर. मग तो तिच्या समोर येऊन बसला.
" काय झाले ? रागावलात ? कान पकडून सॉरी. गेलेल्या गोष्टींचा विचार करण्याची खरे तर मलाही सवय नाही पण त्या आठवणींना विझवणे अजून तरी शक्य झाले नाही. पण यापुढे एखादी चांगली नजरेत आली तर तिला नजरेआड होऊ देणार नाही.पण ती एखादी कधी येईल समोर हे त्या परमेश्वरालाच माहित. बघू.पण तोपर्यंत आपण तुमच्या लव्ह स्टोरीवर लक्ष केंद्रित करू. त्या तुमच्या मिस्टर कॅलिफोर्नियाला या खेपेला सर्व सांगून टाका म्हणजे मुंबईला येण्याचे उत्तम कारण मिळेल आम्हांला. By The way , बोलवाल ना आम्हाला लग्नाला ?"
" अरे व्वा ! हा काय प्रश्न झाला ? अर्थात. निघताना तुम्हाला भारतातला फोन नंबर आणि पत्ता देईल. आणि लग्नापर्यंत काही वाट पाहण्याची गरज नाहीय. तुम्ही कधीही येऊ शकता. तुमच्या घरी पुण्याला तर येतच असाल ना तर तेव्हा आलात कि एक फेरी मुंबईला होऊ द्या. "
"हो . नक्की. पण आपल्या मनातले सांगितल्यावर सर्व मनासारखे होत असताना लग्नाचा बार उडवण्यासाठी तुमच्याकडून वेळ घालवू नका."
निहालने पुन्हा आठवण करून दिली आणि ती विचारात पडली.
"म्हणजे "
"अहो म्हणजे आयुष्य फार unpredictable असते. कोणत्या क्षणी काय होईल सांगता येत नाही ."
"अरे, तुम्हाला अजून शंका आहे ? त्याला मी आवडतेच ... मलाही तो आवडतो... घरच्यांचा म्हणावं इतकं टेन्शन वाटत नाही. मग ... "
" काही नाही. पण जीवनाबद्दल आणि कोणत्याही जीवाबरोबर खेळू नका फक्त इतकेच सांगायचे होते. चला, रात्र खूप झाली आहे. निघायला हवे "
निहाल उठला. आणि दोन पावले पुढे चालू लागला. निर्वीला ते थोडे वेगळे वाटले पण या गोष्टीचे कारण विचारण्याइतकेही त्याचे आचरण विचित्र नव्हते. ती पण उठली आणि चालत जात त्याला गाठले. दोघे पुढे एकमेकांचा निरोप घेऊन आपापल्या जागी गेले. आज शेवटची ती त्या गुलबक्षी रंगात पुन्हा विसावली.

पहाट झाली. निर्वी फार आनंदात होती. काल तिच्या सातासमुद्रापलीकडच्या मित्राने काहीतरी तिच्या कानात सांगितले आणि ते मधुर शब्द अजूनही तिच्या कानांत रुंजी घालत होते. तीला तो आनंद शेअर करायचा होता.म्हणून अगदी ५ वाजल्यापासून ती ८ वाजण्याची वाट पाहत बसली होती. पावणेआठलाच सर्व तयारीनिशी ती खाली उतरली. आमिराने तिचे स्वागत केले. तिने ते स्वीकारले आणि ती त्याची वाट पाहत समोरच बसून राहिली. आठ वाजून पंधरा मिनिटे होऊन गेली तरी साहेबांचा पत्ता नाही तसे तिने त्याबद्दल विचारणा केली तेव्हा समजली निहालच्या आईची तब्येत ठीक नाही म्हणून आईला डॉक्टरकडे दाखवून तो आज जरा उशिरा येणार होता.तिला वाईट वाटले पण करणार काय ? आता वाट पाहण्यापलीकडे पर्याय नव्हता.मनातल्या मनात वाटत होते कि आता उद्यापासून तिची प्रत्येक गोष्ट ऐकून त्यावर आपले मत व्यक्त करणारा सोबत असणार नाही. तेव्हा ती सवय व्हायला हवी आता. पण आज तरी असायला हवा होता ना ? सर्व ठीक असेल ना ? हो हो येईल तो इतक्यात , ती तिच्या मनाचीच समजूत काढत राहिली. पण घड्याळाचा काटा १० वर गेला तरी त्याची येण्याची चिन्हे दिसत नव्हती. अर्धा तास असाच प्रतीक्षेत गेला. घड्याळाच्या पुढे सरकणाऱ्या काट्यासोबत तिची अस्वस्थता वाढत होती. तिने त्याला पुन्हा एकदा शेवटचा फोन करून पाहिला पण व्यर्थ ! त्याने तोही कॉल मिस केला. रेहमान आता हॉटेलमध्ये येऊन पोहोचला होता. आता निघावेच लागेल. तिने अत्यंत जड अंतःकरणाने सामान बाहेर काढले. जाण्यापूर्वी आमिराचा निरोप घेतला आणि सोबत त्याच्यासाठी तिचा भारतातला नंबर आणि पत्ता द्यायला निर्वी विसरली नाही.सर्व सामान गाडीत पोहोचले.पाठोपाठ तीही पोहोचली. गाडी सुरु झाली आणि काही क्षणांत त्या सुंदर जागेचा तिच्या शरीराने निरोप घेतला पण मन मात्र अजून तिथेच त्या बेटावर भिरभिरत राहिले अगदी भारतातल्या विमानतळात पोहोचेपर्यंत...

सर्व सामान संकलित करून निर्वी बाहेर आली. तिच्या नावाची हाक ऐकू आली आणि ती त्या हाकेकडे धावत गेली. तिचा दादा तिला न्यायला आला होता. एक छोटीशी गळाभेट झाली, तिच्या सर्व बॅगा कारमध्ये ठेवल्या गेल्या आणि पाठोपाठ तीसुद्धा आत आली. AC सुरु असल्याने सर्व  बंदिस्त आणि त्यामुळे आजूबाजूचा कोलाहल एकाएकी शांत झाला. दादाने गाडीचा पहिला गियर टाकला आणि ती गाडी रस्त्यावरच्या गर्दीतून वाट काढत पुढे जाऊ लागली.निर्वी मात्र अजूनही शांतच होती आजूबाजूचा परिसर पाहत . 
" तर मग कशी झाली आमच्या निरूची दुबई ट्रिप ?"
"दादा , ट्रिप नव्हती ती. ट्रैनिंग होते. पण छान झाले सर्व. खूप सुंदर देश आहे. आणि तुला माहित आहे ,तिथे खूप सारे भारतीय आहेत?मलाही असेच खूप चांगले मित्र मिळाले तिथे. (ती पुन्हा हरवून गेली पण लगेचच भानावरसुद्धा आली )खूप मस्त आहे सर्वच ... तू पण जा एकदा वहिनीला घेऊन "
" नको बाबा . तुझी वाहिनी नको. करायला जाऊ पिकनिक आणि भलतेच होऊन जायचे. "
दादा अगदी जोरजोरात हसू लागतो. 
" दादा ,तू का रे तिला नेहमी असे बोलत असतोस ? "
" अगं, ३ वर्षे ६ महिने संसार झालाय आमचा. तिला पूर्ण ओळखतो मी."
निर्वी काहीच बोलली नाही... अगदी शांत. 
" पण ते काही असले तरी माझी सरिता स्वभावाने चांगली आहे.
"दादा , मी पण तर तेच म्हणते ना रे ."
" हो पण ती काही गोष्टींमध्ये फार dangerous ... त्यामुळे जरा सांभाळून राहावे लागते ... कसा संसार करतो मी तिंच्यासोबत हे मात्र माझे मलाच माहित.तुला काय कळणार बिचाऱ्या तुझ्या दादाचे दुःख... "
तो पुन्हा कित्तीतरी मोठ्याने हसतो आणि यावेळी निर्वीदेखील त्यात सामील झाली.वहिनी या विषयावर त्यांच्यात नेहमीच थट्टा मस्करी चालायची.सुमन वहिनी खरंच मनाने चांगली असल्याने ती कधी यांचे बोलणे मनाला लावूनही घेत नसे. इकडच्या तिकडच्या कितीतरी गप्पा सुरु असताना तिच्या कॅलिफोर्नियातील मित्राचाही उल्लेख होतो. हे सर्व एकाच शाळेत असल्यामुळे दादा त्याला बऱ्यापैकी ओळखत होता. 
" अरे व्वा ! अमेरिकेत असतो तर तो आता ? छान. तुला माहित आहे , निरू ? सार्थक गेला आणि आमची टीम फुटबाँलमध्ये हरायला लागली होती. खूप चांगला मुलगा होता तो. काय गं , आता पुन्हा कधी येईल तो ? यावेळी मीपण भेटेन म्हणतो . खूप वर्षे झाली त्याला पाहून. "
निर्वी काहीच बोलली नाही. नुसतीच गालात हसली. काहीतरी स्वतःशीच पुटपुटली.अर्थात ते स्पष्टपणे दादाच्या कानांवर गेले नाही. 
" काय म्हणालीस ?अगं हसतेस काय नुसती ? सांग ना कधी येईल ? मला ना असे जाणवतेय निरू कि काहीतरी बिनसलंय तुझं. काय झाले ?"
" दादा, कुठे काय ? किती प्रश्न ? काही नाही झाले. खरंच."
"  आम्हाला नाही पटत.गाडीत बसल्यापासून पाहतोय, हरवली आहेस तू कुठेतरी. घरी पण अशीच राहिलीस तर माझ्यापेक्षा हजार प्रश्न अधिक असतील. म्हणून म्हणतो मला सांग पटपट. आणि आता तू जोपर्यंत काही सांगणार नाहीस तोपर्यंत ही गाडी पुढे जाणे शक्य नाही."
" दादा , काही काय. तू सुरु कर बरे पटकन. आई वाट पाहत असणार ."
"अजिबात नाही "
दादा हट्टच करून बसला. निर्वीलाही खरेतर दादाला सर्व सांगायचे होते. तिने हिम्मत एकवटली. आणि हॉटेलमधले त्याने केलेले प्रोपोज , विमानतळावरची भेट , चॅटिंग ... तिच्या मनातल्या त्याच्याविषयीच्या भावना ... सर्व सर्व दादासमोर सांगून मोकळी झाली ती. दादाला काय वाटत असेल हे तिला आता लवकरात लवकर जाणायचे होते. पण त्याच्या चेहऱ्यावरून त्याबद्दलचा कोणताच अंदाज बांधता येत नव्हता. आणि इतक्या वेळापासून बोलणारा तो एकाएकी शांत झाला. एकवार तिच्यावर नजर टाकली आणि पुढच्याच क्षणी " चला आता निघायला हवे. घरी वाट पाहत असणार" म्हणत त्याने गाडी सुरु केली. तसा तिचा चेहरा अधिक गंभीर झाला. निर्वी पुन्हा पुन्हा स्वतःची प्रामाणिक , स्वच्छ बाजू मांडण्याचा प्रयत्न करत राहिली,... त्याला प्रतिसाद नाही म्हणून विषय बदलून काही बोलण्याचा प्रयत्न सुरु राहिला तिचा. पण छे ! दादा काहीच बोलत नाही. ते पाहून शेवटी तीच शांत झाली. मनातल्या मनात याला का सांगितले याचा पश्चाताप होत होता तिला. तिला मनोमन वाटले होते कि दादा साथ देईल तिची, तिला तो तरी समजून घेईल, पण तिचा हा अंदाज चुकला होता. असे कसे होऊ शकते यावर अजूनही तिचा विश्वास बसत नव्हता. हे त्याला आवडले नाही असे आता तरी तिला जाणवत होते. पण का ते मात्र तिला कळत नव्हते. आता हा करेल ? घरी सांगेल का ? घरी सर्व काय म्हणतील ? मोठे भांडणच होईल . आई तर रडायलाच लागेल....कुणाला माझी बाजू पटणार का ?... मी घाई केली का ?... अजून तर सार्थकलासुद्धा काही माहित नाही... काय केले मी हे ?... ती अशा कितीतरी विचारांनी घेरली गेली होती. वरून शांत दिसत असली तरी मनातल्या मनात खूप सैरभैर झाली होती ती...आणि तेव्हा त्या क्षणाला तिला तिच्याही नकळत तिचा तो नवा मित्र आठवून गेला. तो असा न भेटताच कुठेतरी हरवून गेला असे तिला सारखे जाणवत राहिले. निहालच्या मतांची ,मदतीची तिला सवयच झाली होती आता जणू... ती स्वतःलाच विचारत होती कि त्याने असे दादाला लगेच सांगण्याचा सल्ला दिला असता ?एक मन म्हणत होते ... हो. कारण निहाल नेहमीच म्हणायचा कि अशा गोष्टींसाठी वेळ घालवायचा नसतो.... पण आता चुकले का माझे... 


निर्वी विचारांतून बाहेर आली आणि एका वेगळ्या आशेने दादाकडे पाहत होती. तो तल्लीन होता गाडी चालवण्यात. आता हायवे लागला होता अवघ्या काही मिनिटांवर घर होते. तिने कशीबशी पुन्हा हाक मारली , 
"दादा ... "
यावेळी त्याचा हुंकार कानांवर आला आणि तिला थोडे बळ आले. पण ती काही बोलणार त्यापूर्वी त्यानेच तिच्यासमोर प्रश्न टाकला . 
"ही गोष्ट आणखी कोणाला माहित आहे ?"
" दादा , कुणालाच नाही. अगदी खरे ."
" गुड. पण मग आता सांगायची. आजच घरी सांगूया आपण."निर्वी चक्रावलीच ते ऐकून. 
" नको नको... आज का ? इतक्या लवकर नको "
" अगं का म्हणजे? इतकी छान बातमी सांगितली आहेस तू. आणि अशा गोष्टींसाठी वेळ घालवायचा नसतो.लगेच कुठे  आपण. घरच्यांनाही  दृष्टीने  घेऊ दे की . पण त्यांना हे माहित हवे.त्यांच्यापासून हे असे लपवून ठेवणे मला पटत नाह. मी आज बाबांशी बोलून घेईन. मी समजावेंन त्यांना. मला खात्री आहे तेही मान्य करतील. कारण मुळात सार्थक खूप चांगला मुलगा आहे.ते घरही चांगले आहे .आणि विशेष म्हणजे आपण ओळखतो त्यांना. मला तर खूप आवडेल जर असे खरोखर भविष्यात घडून आले तर. "
हे ऐकले आणि निर्वीचा आनंद गगनात मावेनासा झाला. तिने त्याही अवस्थेत आनंदाने तिच्या भावाला मिठी मारली. आणि लगेचच ती सावरली. 
" दादा , पण आता तू काही सांगू नकोस रे घरी."
"अगं , पण मी २ दिवसांनी परगावी जाईल तो थेट २ महिन्यांनी परत येईल म्हणून म्हणत होतो."
" हो दादा , मान्य आहे रे. पण माझा होकार अजून त्यालाही माहित नाही. तो पुढच्या महिन्यात येईल तेव्हा मी सांगणार आहे सर्व त्याला आणि मग त्यानंतर तू आलास कि पुढचे बघू. कारण जर आत्ताच सांगितले तर तुला माहित आहे ना आपल्या घरी कसे आहेत ते ... "
" हो बरोबर बोलतेस तू. याना सांगितले आणि मान्य असेल तर बाबा उद्याच जाऊन पोहोचतील त्यांच्याकडे.... तशीही त्यांना घाईच लागली आहे आता."
"काय... ???"
"काही नाही . तू सोड ते. मग मी आल्यावरच बघू आपण. तोपर्यंत तू याबाबत सांगू नकोस कुणाला. आणि खास करून तुझ्या वहिनीला. समजले ना ?
दादाने अगदी सहज विषय दुसरीकडे वळवला. निर्वी मात्र फार खुश होती. त्यानंतर तिने घर येईपर्यंत स्वतःला जागेपणच्या स्वप्नांच्या दुलईत सामावून घेतलं. 

घरात पाऊल टाकले आणि इतक्या वेळापासून शांत असलेले घर एकदम भरल्यासारखे वाटू लागले. आईने तिच्या आवडीच्या पुरणपोळीने तिचे स्वागत केले तर बाबांनी प्रवासातील चौकश्यांनी. वहिनीच्या प्रश्नांना तर तासभर उलटून गेला तरी पूर्णविराम लागत नव्हता. एव्हाना बरीच रात्र झाली होती. सकाळपासूनच्या मानसिक आणि शारिरीक उलाढालींमुळे तिचा जीव पार थकून गेला होता. ते आईच्या लक्षात आले आणि तिने साऱ्यांना झोपण्याचा इशारा केला. 

निर्वी झोपण्यासाठी गेली आणि अगदी क्षणभरासाठी तिला तिची मऊशार गुलबक्षी, गेले कित्येक दिवसांपासून असलेली सोबत आठवली ... पण अगदी क्षणभरासाठी. कारण आता ती जगातल्या सर्वात मौल्यवान कुशीत विसावलेली होती. ते जाणवले तशी तिने आईला घट्ट मिठी मारली. त्या उबदार स्पर्शाने तिला लगेच झोप आली आणि हळूच ती त्याच स्वप्नांच्या दुनियेत शिरली. दादाच्या संमतीने ही स्वप्नांची दुनिया आता अधिक उजळली होती. पण त्या प्रकाशात कितीतरी सावल्या तिला दिसत होत्या काही ओळखीच्या ... काही अनोळखी... आणि काही ओळखीच्या असूनही अनोळखी वाटणाऱ्या... 

- रुपाली ठोंबरे.

4 comments:

  1. next part? or it is completed?

    ReplyDelete
    Replies
    1. This comment has been removed by the author.

      Delete
    2. Thanks for reading...a link for next part is added now...

      Delete
  2. Please पुढील भागाची लिंक पोस्ट करा.

    ReplyDelete

Blogs I follow :